वाशिम : स्थलांतरणाचा नियम डावलून मानोरा तालुक्यातील एका शिक्षण संस्थेने मानोरा येथे मान्यता असलेली खासगी प्राथमिक शाळा सोमठाणा ग्रामपंचायत हद्दीत थाटली असल्याचा अहवाल मानोरा गटशिक्षणाधिकार्यांनी दिला आहे. या अहवालाच्या आधारे सदर संस्थेने परवानगी असलेल्या ठिकाणी शाळा सुरू करावी अन्यथा एका महिन्याच्या आत शाळा बंद करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी ४ जुलै रोजी काढला आहे. लोकहित मागासवर्गीय शिक्षण व सांस्कृतिक क्रीडा मंडळ गुंडी ता. मानोरा या संस्थेंतर्गत प्रशिक प्राथमिक शाळा गत काही वर्षांपासून सोमठाणा ग्रामपंचायत हद्दीत सुरू आहे. या शाळेची मान्यता राहुल पार्क मानोरा येथे आहे. नियमानुसार मान्यता असलेल्या ठिकाणी शाळा सुरू ठेवणे गरजेचे आहे. एका ठिकाणावरून अन्य ठिकाणी शाळा स्थलांतरित करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते. शिक्षण विभागाची परवानगी न घेता प्रशिक प्राथमिक शाळा मानोर्याऐवजी सोमठाणा ग्रामपंचायत हद्दीत सुरू असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी शिक्षण विभागाकडे नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने मानोरा गटशिक्षणाधिकार्यांचा अहवाल मागविला. सदर शाळेची मानोरा येथे परवानगी असतानाही सोमठाणा ग्रामपंचायत हद्दीत ती शाळा सुरू असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकार्यांनी दिला आहे. या अहवालाच्या आधारे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांनी सदर शाळा परवानगीच्या ठिकाणी हलविण्यात यावी अन्यथा एका महिन्याच्या आत शाळा बंद करून, या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन आरटीई अँक्टनुसार नजीकच्या शाळेत करण्यात येईल, असा आदेश ४ जुलै रोजी काढला आहे.
मान्यता एका ठिकाणी अन शाळा भरते दुस-या ठिकाणी!
By admin | Published: July 06, 2016 2:45 AM