सुनील काकडे, वाशिम: तालुक्यातील गट ग्रामपंचायत पंचाळाच्या सरपंचांने मनमानी करणे सुरू केले. यामुळे विकासकामे थांबली असून ऐनवेळी स्थळ बदलून घेतलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या कुठल्याही समस्येवर चर्चा न झाल्याचा मुद्दा समोर करून चार गावांमधील शेकडो ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारत ४ सप्टेंबर रोजी ग्रा.पं. कार्यालयासमोर ‘जवाब दो’ आंदोलन केले.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, पंचाळा ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा २९ ऑगस्ट रोजी घेतली. ही सभा मोहगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळेत होईल, असे कळविण्यात आले; मात्र नियोजित ठिकाणी ग्रामसभा न घेता ती ऐनवेळी इतरत्र घेण्यात आली. त्यामुळे अनेकांना सभेला हजर राहता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या ग्रामपंचायतीकडे सव्वा कोटी रुपयांचा निधी पडून असताना कुठलीच कामे केली जात नाहीत. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी एकजूट दाखवत ४ सप्टेंबर रोजी ‘जवाब दो’ आंदोलन केले. चारही गावांमधील जिल्हा परिषद शाळांची कामे, नाल्यांची स्वच्छता, स्मशानभूमीची कामे, गरजूंना घरकुल बांधून देणे, पाणीपुरवठा योजना आदींसह इतरही अनेक विषयांवर आवाज उठविण्यात आला. आंदोलनात पंचाळा, सुरकंडी, मोहगव्हाण येथील शेकडो ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.