लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरिप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन, तुरीचे क्षेत्र किंचित घटणार असून, मुंग आणि उडिद या कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रस्तावित आकडेवारीवरू स्पष्ट होत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ६ हजार ५१ हेक्टर आहे. गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार ४६६ हेक्टरवर पेरणी झाली झाली होती, तर यंदा ४ लाख १३ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ११ हजार २८३ हेक्टरची वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाला असली तरी, सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत घटणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रस्तावित आकडेवारीत नमूद आहे. गतवर्षी २ लाख ८्र७ हजार २२७ हेक्टर असलेला सोयाबीनचा पेरा यंदा २ लाख ८्र० हजार ४०० हेक्टरवर, ६३ हजार५०१ हेक्टर असलेला तुरीचा पेरा ६० हजारांवर, तर १८ हजार ६३० हेक्टर असलेला कपाशीचा पेरा १८ हजारांवर येणार आहे. दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत मुगाचा पेरा १२ हजार ६०० हेक्टरवरून वाढत २५हजार हेक्टर, उडिदाचा पेरा १५ हजार २१७ हेक्टरवरून २४ हजार हेक्टरवर होणार आहे. त्याशिवाय यंदा ज्वारीचे क्षेत्र ९३ हेक्टर, तिळाचे १०८ हेक्टर, तर इतर पिकांचे क्षेत्र ८५७ हेक्टरने वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रस्तावित आकडेवारीत नमूद आहे.