प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सक्षम अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रासाठी निर्गमित केलेल्या सूचना, आदेश यापुढेही कायम राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचे चिन्हांकन, त्यामधील कोविड प्रतिबंधासाठी हाती घेतलेले काम अबाधित सुरू राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कुठल्याही ठिकाणी कोविड-१९ विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यास, असे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल. या प्रतिबंधित क्षेत्रातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तातडीने घेणे व विलगीकरण ७२ तासांच्या आत पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. प्रतिकोविड बाधित रुग्णाच्या संपर्कातील २० ते ३० व्यक्तींची तपासणी करण्यात यावी. घरी विलगीकरण केलेल्या रुग्णांचा व त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा १४ दिवस सातत्याने वैद्यकीयदृष्ट्या पाठपुरावा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नियमांचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समूह यांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.