नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसार भूसंपादन, रस्ते विकास, भूमिगत गटार योजना, रस्ते सुशोभीकरण व दुभाजक निर्मिती, मुलांना खेळण्याकरिता क्रीडांगण, ठिकठिकाणी पथदिवे, पार्किंगची सोय, शहरातील चौकांचे सुशोभीकरण आदी बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मालेगाव शहराचा विकास आराखडा तयार झाल्याने नकाशामध्ये शहरातील राखीव भूखंड तसेच मोकळ्या जागा, पार्किंग कुठे व किती आहेत तसेच शहरातील टोलेजंग इमारती, दुकानेसुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण क्षेत्रात दिसत आहेत. अनेकांनी घरासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचेही प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखड्याच्या नकाशात दिसून येत आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणूक रस्ता तसेच शहरातील अन्य ठिकाणी फोफावलेली अतिक्रमणे निघतील का, भूखंड नियमानुकूल होणार किंवा कसे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, २८ मेपर्यंत विकास आराखड्याविरुद्ध आक्षेप व हरकती दाखल करता येणार आहे. त्यानुसार, ज्यांची कुठलीही तक्रार असेल त्यांनी विहित मुदतीत प्रशासनाकडे दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
.....................
कोट :
मालेगाव शहर विकास आराखडा सूचना व हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे, सदर आराखड्याची मूळ प्रत नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. नागरिकांनी २८ मेपर्यंत त्यांच्या सूचना व हरकती नगरपंचायत कार्यालयात दाखल कराव्या.
डॉ. विकास खंडारे
न.पं. मुख्याधिकारी, मालेगाव