- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी तलाव वाशिमकर निसर्गप्रेमी याच्यासाठी पर्वणीच आहे. मग ती डबे खाण्याकरिता सहभोजनाची सहल असो वा जलशयातून होणारा अतिरिक्त पाण्याचा वाहनारा विसर्ग . यासर्व निसर्गातील सौंदर्याचा रसीक निसर्गप्रेमी नेहमीच आनंद घेतात. त्याचबरोबर परदेशी पक्षी देखील एकबुर्जी तलावाचा व सभोवतालच्या परिसराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दरवर्षी न चुकता येतात. यामुळे पक्षीमित्र निसर्गमित्र, अभ्यासक यांना मनमुराद आनंद लुटता येतो. मागील दोन दशकापासून हजारो किलोमिटरचा प्रवास करुन न चुकता रोहीत पक्षी फ्लेमिंगो हे एकबुर्जी जलाशयावर येतात. यावर्षीही ते दाखल झाले आहेत.कच्छच्या रणातून येणारा हा पक्षी खूप देखणा तथा पाहता क्षणीच मनाला आनंद देणारा पक्षी आहे. या पक्षाला आवश्यक खाद्य, सुरक्षीत वातावरण या एकबुर्जी परिसरात मिळते. त्यामुळेच पक्षी दोन दशकांपासून एकबुर्जी जलाशयावर नियतिपणे येत असल्याचे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. सध्या रोहीत पक्षांचा २० ते २२ च्या संख्याचा एक जथ्था एकबुर्जीत दाखल झाला आहे. तर काही दिवसात ५ ते ६ पटीने हा जथ्था वाढेल अशी खात्री पक्षीमित्र तथा माजी वन्यजीवरक्षक प्रशांत जोशी, प्रसिध्द फोटोग्राफर मिलींद गंडागुळे, प्रविण जोशी, पवन इंगळे, योगेश जोशी, सुनिल सरकटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच मार्गदर्शक, अभ्यासक यांनी एकबुर्जी या जलाशयावर येणाऱ्या पक्षांना अधिक सुरक्षीतता व पोषक वातावरण उपलब्ध होण्याकरिता काय करता येईल यावर वनविभागाने उपाय योजना आखणे गरजेचे आहे. वाशिमच्या एकबुर्जी तलावाला रामसर तलावाचा दर्जा देण्यात यावा जेणे करुन येथील वनसंपदा निसर्ग सौंदर्य अबाधीत राहण्यास मदत होईल असे पक्षीमित्र माजी मानद वन्यजीव रक्षक प्रशांत जोशी, अकोला येथील पक्षीमित्र माजी वन्यजीव रक्षक दीपक जोशी यांनी मनोदय व्यक्त केला.
एकबुर्जी तलावावर रोहीत पक्ष्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 2:57 PM