वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. दुसरीकडे सोयाबीनचा अपवाद वगळता अन्य शेतमालाच्या भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसत आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षीच या ना त्या कारणाने विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. गत एका वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना ही बसत आहे. कोरोनाच्या सावटाखालीच गतवर्षातील खरीप हंगाम गेला. यंदा एका महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असल्याने बी-बियाणे, खते, शेतीची मशागत यासह अन्य शेतीविषयक कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री आणि पीक कर्जाची उचल याशिवाय पर्याय नाही. अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी शक्यतोवर सोयाबीन काढणी झाल्यानंतरच शेतमाल विक्री करतात तर अन्य शेतकरी चांगले बाजारभाव आल्यानंतर शेतमालाची विक्री करतात. आता खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढत असल्याचे दिसून येते. मात्र, सोयाबीन वगळता हरभरा, तुरीचे बाजारभाव घसरल्याचे दिसून येते. सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल ६,५०० - ७,३०० या दरम्यान भाव आहेत. गत महिन्याच्या तुलनेत जवळपास ६०० ते ७०० रुपयांनी भावात वाढ झाली आहे. हरभरा प्रति क्विंटल ४,५०० ते ५,००० तर तूर प्रति क्विंटल ६,६०० ते ६,७०० या दरम्यान भाव आहे. या दोन्ही शेतमालाच्या बाजारभावात जवळपास ८०० रुपयांनी घट आल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
००००००
बॉक्स
१) दररोज होणारी आवक (क्विंटलमध्ये)
धान्य भावआवक
सोयाबीन६,५०० - ७,३०० २,०५१
तूर४,५०० - ५,००० ३,४७०
हरभरा६,६०० - ६,७०० ४,५९०
००००
प्रतिक्रिया
आवक वाढली की शेतमालाच्या किमतीत घट येते, याचा अनुभव हा दरवर्षीचाच आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. मात्र, सोयाबीन वगळता अन्य शेतमालाच्या किमती कमी झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे.
- सोनुबाबा सरनाईक, शेतकरी
.......
२०२० मध्ये नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. उत्पादनातही घट आली. खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतमाल विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, तूर, हरभऱ्याचे बाजारभाव कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागते.
- गौतम भगत, शेतकरी
.......
खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. लॉकडाऊनमुळे वरच्या दरापेक्षा स्थानिक स्तरावर १०० ते २०० रुपये दर कमी मिळत आहेत. सोयाबीनला मात्र झळाळी आहे.
- आनंद चरखा, व्यापारी
.....
तूर व हरभऱ्याच्या तुलनेत सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत तूर व हरभऱ्याच्या बाजारभावात घट आहे.
- सुभाष शिंदे, व्यापारी
००००००००