तीर्थक्षेत्र पुसेगाव येथून वाशिम येथे आगमन होताच दिगंबर जैन समाजाच्यावतीने मुनी संघाचे स्वागत करण्यात आले. स्थानिक जुनी नगर परिषद येथील त्यागी भवन येथे श्रवणमुनी विशेष सागरजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मनुष्य हा सकाळी झोपेतून उठतो, आंघोळ करतो, टीव्ही बघतो, व्यायाम करतो, तीर्थयात्रा करतो, मंदिरात जातो, स्वाध्याय करतो. या सर्व क्रिया केवळ वेळ काढण्यासाठी करीत असून आपले पापकर्म त्यामुळे नष्ट होत नसतात; मात्र वेळ कधीच सांगून येत नाही. परमात्मा हा स्वत:च्या आत असून त्याला ओळखण्याची कला असली पाहिजे. जीवनामध्ये ज्याने वेळेला महत्त्व दिले, तो व्यक्ती यशस्वी होतो. एकदा वेळ हातून गेल्यावर व्यक्तीला पश्चात्तापाशिवाय पर्याय नसतो. वेळेचा सदुपयोग करणारा नेहमी सूर्योदयापूर्वी उठतो. यामुळे स्वत:च्या अंतरात्म्यामध्ये परमात्म्याचे दर्शन होते. सकाळी चार ते पाच वाजता उठणारा व्यक्ती हा भगवंतासमान, पाच ते सहाच्या दरम्यान उठणारा व्यक्ती मनुष्यासमान, ६ ते ७ च्यामध्ये उठणारा व्यक्ती पशुसमान, तर ७ वाजताच्या नंतर उठणारा व्यक्ती राक्षसासमान असतो, असे त्यांनी सांगितले.
परमात्मा हा बाजारात मिळत नाही, असे सांगत विविध दाखल देत त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी श्रवणमुनी विशेष सागर महाराज यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे ३१ फूट उंचीची महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठी भगवान बाहुबलीची प्रतिमा स्थापन होत आहे. या पवित्र कार्यात वाशिम जिल्ह्यातील भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.