मे महिन्याला सुरुवात होताच भर जहागीर गावासह परिसरातील इतरही अधिकांश गावांमध्ये पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. नदी-नाल्यांसह विहिरी, कूपनलिका, हातपंपांची पाणीपातळी खालावली असून जंगल परिसरातही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भर जहागीरपासून जवळच असलेल्या जवळा, कुऱ्हा, मांडवा, मोहजाबंदी या गाव परिसरात जंगल वसलेले असून त्यात विविध स्वरूपातील वन्यप्राण्यांचा वावर आहे. दरम्यान, जंगलातील बहुतांश नैसर्गिक नदी-नाल्यांतील पाणी आटले आहे. वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. यामुळे विशेषत: माकडांनी नागरी वसाहतींमध्ये उच्छाद मांडणे सुरू केले आहे. सध्या प्रत्येक गावात कुरडई, पापडी तयार करून घराच्या छतावर सुकविण्यात येत आहेत. त्यावरच माकडांकडून ताव मारणे सुरू असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने जंगलांमधील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
जंगल परिसरातील कृत्रिम पाणवठेही कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:39 AM