मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांसह विविध लहानमोठ्या उद्योगांना उभारी देण्यासाठी मध्यंतरी पॅकेज जाहीर करून या घटकांना मदतीचा हात पुढे केला. मात्र या पॅकेजमध्ये लोककलावंतांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्यामुळे आणि दुसरीकडे कोणतीही कामे नसल्याने कलावंतांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला. आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी वाशिमसह राज्यातील लोककलावंतांनी यापूर्वीही जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे केली होती. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत कोरोनाचा आलेख खाली आल्याने काही प्रमाणात लोककलावंतांना रोजगार मिळाला. परंतु गत १५ दिवसांपासून कोरोनाचा आलेख पुन्हा झेपावत असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या. त्यामुळे कोणतेही काम नसल्याने आर्थिक पेच निर्माण होत असून, यामधून सावरण्यासाठी शासनाने लोककलावंतांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लोककलावंत संघटनेने शुक्रवारी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे केली.
शासनाच्या पॅकेजकडे कलावंतांचे लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:48 AM