मंगरूळपीर: आसेगाव पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्रेत्यांसह वरली, मटक्याच्या धंद्यांवर कारवाई करताना ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यासह १५ पेक्षा अधिक आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत काही खेड्यांमध्ये छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री करण्यात येत होती. शिवाय वरली, मटक्याचा अवैध व्यवसायही सुरू होता. या संदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार स्वप्नील तायडे आणि पोलीस उपनिरीक्षक किशोर खांडार यांच्या मार्गदर्शनात दोन पथकांनी पाळोदी, रुई, खापरदरी येथील वरली, मटका, जुगारांवर धाड टाकत १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चार आरोपींवर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय हिवरा येथे जुगार तर बिठोडा येथे अवैध दारूविक्री करणाऱ्यासह इतर पाच जणांकडून जुगार साहित्य जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त दारू विक्रीच्या प्रकरणात ३ जुलै रोजी पोलीस स्टेशन परिसरातील विविध खेडेगावांत कारवाई करीत एकूण ७० हजार रुपयांची दारू पकडण्यात आली. त्यात एक कारवाई वटफळ आणि दुसरी कासोळा येथे झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कृतीत आतापर्यंत दारू, वरली, जुगारप्रकरणी ९० हजार रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. वरील सर्व कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार स्वप्नील तायडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किशोर खांडार, पोलीस कर्मचारी नीलेश अहिर, राजू महाले, गणेश भोयर, सचिन जाधव, उषा अटक, संदीप नापते, विजय शिंगारे, चांद रेघीवाले, विजय गायकवाड, विठ्ठल उगले यांच्या पथकाने केली आहे.