आसेगाव (वाशिम) : मागील ६ ते ८ महिन्यांपासून आसेगाव येथील आठवडी बाजाराच्या दिवशी नियोजित जागा सोडून काही व्यावसायिक रस्त्यावर दुकाने थाटत आहेत. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा निर्माण होऊन ग्रामस्थांनाही अडचणी येत आहेत. या प्रकाराची दखल ग्रामपंचायतने घेत शनिवार १ डिसेंबर रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी दवंडीद्वारे व्यावसायिकांना कारवाईचा इशारा दिला आहे.मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव ही ग्रामीण भागातील एक मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील २५ ते ३० गावचे ग्रामस्थ, तसेच जिल्हाभरातील व्यावसायिक या बाजारात खरेदीविक्रीसाठी येतात. गत काही महिन्यांपूर्वी या आठवडी बाजारात जाणारा एका बाजूचा रस्ता बंद झाला आहे. या मार्गावर व्यावसायिक प्रतिष्ठाणांची उभारणी करण्यात आल्याने बाजारात येण्याचा हा मार्ग बंदच पडला आहे. त्यामुळे या भागात दुकाने थाटणाºयांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने त्यांनी थेट गावच्या मुख्य चौकालगत रस्त्यावर दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण होत आहे, तसेच बाजार संपल्यानंतर मोठ्य प्रमाणात घाण कचरा पसरून पर्यावरण प्रदुषीत होत आहे. याचा त्रास ग्रामस्थांसह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, पोलीस स्टेशन आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतच्यावतीने शनिवारी आठवडी बाजारात दवंडी देऊन या पुढे रस्त्यावर दुकाने न लावण्याची सुचना व्यावसायिकांना देण्यात आली आणि या सुचनेची दखल न घेतल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
आसेगावचा आठवडी बाजार रस्त्यावर; वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 5:29 PM