वाशिम : मालेगाव तालुकाअंतर्गत मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आशा गट प्रवर्तक पद भरती चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे, अशी तक्रार संदीप चंद्रभान सावळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकार्यांकडे करून चौकशीची मागणी १८ जून रोजी केली आहे. सावळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद सामान्य प्रशासन, आरोग्य विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आशा गट प्रवर्तक पद भरतीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी आपल्या सेवा व कर्तव्यात कसूर करून अपात्र अर्जदारास पात्र ठरविले आहे. जानेवारी २0१५ मध्ये मेडशी, जऊळका व शिरपूर या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मानधन तत्त्वावर आशा गटप्रवर्तक या पदाची भरती राबविण्यात आली. तीनही प्राथमिक आरोगय केंद्रावर या पदासाठी अर्ज केलेल्या अर्जदारापैकी १५ अर्जदारांना मूलभूत संगणक कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसल्याने मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे; परंतु हाच निकष मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पदासाठी लावला नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात सविस्तर चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कारवाईची मागणी सावळे यांनी तक्रारीतून केली आहे.
आशा गट प्रवर्तक पद भरती चुकीच्या पद्धतीने
By admin | Published: June 22, 2015 2:00 AM