वाशिम : अल्प मानधन, दिवाळीला बोनस देणे, मोबदल्यात वाढ करणे यांसह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या (आयटक) नेतृत्वाखाली १८ आक्टोंबरपासून पुकारलेले बेमुदत कामबंद आंदोलन २६ आॅक्टोबरपर्यंत सुरूच असल्याने आरोग्य विभागाचे कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात १०४५ आशा स्वयंसेविका तर ४६ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना कामाचा अत्यल्प मोबदला देण्यात येतो तर काही कामे हि विनामोबदला सुध्दा करुन घेतली जातात, आशा सेविकांना ऑनलाईनची कामे देण्यात येऊ नये, मोबदल्यात वाढ करावी यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ आक्टोंबरपासून आयटक संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले. गुरूवारीदेखील (दि.२६) या आंदोलनात आशा, गटप्रवर्तकांचा १०० टक्के सहभाग लाभल्याने कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.
इतर संघटनाही रस्त्यावर -- आशा, गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इतरही संघटना रस्त्यावर उतरल्याचे दिसून येते. २६ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचेवतीने संघटना अध्यक्ष राजकुमार पडघान, अनिल कांबळे, माधव डोंगरदिवे, समाधान अवचार, जगदीश मानवतकर यांनी भेट देऊन आशा, गटप्रवर्तकांच्या समस्या जाणून घेतल्या.
- वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी यांच्यावतिने युवा जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांनी आंदोलन मंडपास भेट दिली. कोरोनाकाळात आशा, गटप्रवर्तकांनी जीवाची पर्वा न करता सेवा बजावली. त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी भूमिका गरकळ यांनी मांडली.