वाशिम जिल्ह्यात ९६८ आशा व ४८ गटप्रवर्तक सन २००९ पासून काम करीत आहेत. कोरोनाकाळात शासनाच्या विविध मोहिमेत सहभागी होत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी कर्तव्य बजावले आहे. घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करणे, सर्वेक्षण करणे, रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण अंतर्गत शिबिराला उपस्थित राहून काम करणे आदी जबाबदाऱ्या आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त नेमून दिलेल्या ७२ पेक्षा अधिक कामे करावी लागतात. असे असतानाही कोविड काळातील मानधन नियमित मिळत नाही. मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज मिळत नसल्याने सुरक्षिततेचे उपाय कसे करावेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आशांना दरमहा १८ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दरमहा २१ हजार रुपये मानधन देणे, आशा गटप्रवर्तकाना शासकीय सेवेत नियमितपणे सामावून घेणे यासह विविध मागण्या आयटक संघटनेच्यावतीने केल्या. परंतु, अद्याप दखल घेतली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा व गटप्रवर्तकांनी राज्याध्यक्ष राजू देसले, राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, जिल्हाध्यक्षा संगीता काळबांडे, जिल्हा संघटिका वंदना हिवराळे यांच्या नेतृत्वात १५ जूनपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
विविध मागण्यांसाठी आशा गटप्रवर्तक संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:54 AM