वाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेकरिता जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर १७ जून रोजी धरणे आंदोलन केले.यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी कोरोना काळात कुठलीही कुचराई न करता चोखपणे कर्तव्य बजावले. त्यामुळे त्यांना प्रतीदिन ३०० रुपये मानधन देण्यात यावे. यासह आशा स्वयंसेविकांना महिन्याला १८ हजार व गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये वेतन देण्यात यावे. यासोबतच आरोग्य विभागाशी निगडीत काम असल्यामुळे त्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज देण्यात यावे. आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, आदी मागण्या प्रलंबित असून त्या विनाविलंब निकाली काढाव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.वाशिम जिल्हा आयटक संघटना व कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, जिल्हाध्यक्ष संगीता काळबांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात लंका शेंडे, वर्षा भगत, छाया जाधव, सविता भगत, सुनिता राठोड, सुरेखा काष्टे, आनंदा वानखेडे यांच्यासह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाले होते.
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे वाशिममध्ये धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:13 PM