आसोला खुर्द : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक-दोन वर्षांपूर्वी कठोर पद्धतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. आता मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गावागावांत उघड्यावर शौचवारी सुरू झाली आहे. आसोला खु. येथे यामुळे रस्त्यांवर घाण पसरल्याने ाआजारांना आमंत्रण मिळत असल्याने स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
पंचायत समिती प्रशासनाकडून ग्रामीण भागातील जवळपास सर्वच गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे शौचालयांचे उद्दिष्टही पूर्ण झाले; परंतु त्यानंतर कर्मचारी वर्गाने हगणदरीमुक्तीचे सातत्य राखण्याबाबत दक्षता बाळगली नाही. त्यामुळे ग्रामस्थ शौचालयाचा वापर न करता सर्रास उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आसोला खु. येथेही असेच चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. काही ठिकाणी, तर शौचालयाचा न्हाणी घर म्हणून किंवा धुणीभांडी करण्यासाठी वापर होत असल्याचे दिसते. उघड्यावरील शौचवारीमुळे आसोला येथे दुर्गंधी पसरली असून, गावात प्रवेश करताच नाकाला रुमाल लावावा लागत आहे.