शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित मोठ्या प्रमाणात झाडे लावून जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या संगोपनावर कोट्यवधींचा खर्च केला. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असताना आसोला खु. परिसरातील जंगलातून जिवंत झाडांची कत्तल करून त्याची राजरोस ट्रॅकद्वारे वाहतूक केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांना अल्प मोबदला अल्प देऊन विना परवानगी मोठमोठ्या झाडांची कत्तलही केली जात असल्याचे दिसत आहे. हा प्रकार सर्रास सुरू असतानाही मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मात्र याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. शासकीय सुटीच्या दिवशी जंगलातील जिवंत झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात आसोला खुर्द या परिसरात केली जात आहे. आसोला खु. ते गव्हा रस्त्यावरील शेकडो वृक्षाचा कत्तल करण्यात आल्याचे दिसत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन अवैध वृक्ष तोडील लगाम लावण्याची मागणी पर्यावरणप्रेमी कडून होत आहे.
--------------
कोट: जंगलातील वृक्षांची अवैध कत्तल होत असल्याची तक्रार अद्याप आमच्याकडे कोणाकडून करण्यात आली नाही. जनतेने तातडीने या प्रकाराची माहिती देऊन वन विभागाला सहकार्य करायला हवे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नसून, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाहणी करून तपास करण्याच्या सूचना देण्यात येतील.
- सुमंत सोळंके,
उपवनसंरक्षक, वाशिम (प्रादेशिक)