लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्यातील उमरीखुर्द येथील प्रसिद्ध असलेल्या शामकीमाता मंदिरासमोर पौर्णिमेनिमित्त दान केलेल्या पैशाच्या कारणावरून पंजाब राठोड उर्फ पंजाब महाराज यांची हत्या झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. राहुल अजाबराव राठोड (२८) रा. उमरीखुर्द यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी सचिन उल्हास राठोड हा उमरीखुर्द येथील शामकीमाता मंदिरासमोर उभा होता. पौर्णिमा असल्यामुळे उमरी येथे आलेले भाविक बंद असलेल्या मंदिरामध्ये पैसे दान करीत होते. आरोपी हा दान केलेले पैसे घेत असल्याने, मंदिरावर अधिकार नसल्याने या प्रकाराला फिर्यादीने आक्षेप घेताच आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करीत जिवाने मारण्याची धमकी दिली. काही वेळानंतर आरोपी हा आपले नातेवाईक सुनील विलास राठोड, दिलीप शेषराव राठोड, पवन दिलीप राठोड यांच्यासह हातात लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीचे घरासमोर आले. फिर्यादीचे मोठे वडील पंजाब उत्तमराव राठोड यांनी भांडण करू नका असे म्हणताच, आरोपी सचिन राठोड याने लोखंडी रॉडने पंजाब महाराज यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत पंजाब महाराज यांना उपचारार्थ दिग्रस येथे दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला व इतरांनादेखील यावेळी मारहाण करण्यात आलीे. घटनेची माहिती प्राप्त होताच अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, पोलीस निरीक्षक विजय पाटकर, आसेगावचे पोलीस निरीक्षक लष्करे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवारी रात्रीच चारही आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सचिन उल्हास राठोड, सुनिल विलास राठोड, दिलीप शेषराव राठोड, पवन दिलीप राठोड यांच्या विरूध्द कलम ३०२,३०७ , ४५२ , ३२३, ३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक करीत आहेत.
मंदिरात दान केलेल्या पैशाच्या कारणावरून पंजाब महाराजांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 3:46 PM