लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नायलॉन जाळ्यांच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी पाच हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश रामभाऊ खोपे यास मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) कार्यालय वाशिम येथून ११ जून रोजी रंगेहात ताब्यात घेतले. लाचप्रकरणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सुभाष नागोराव सुखदेवे व सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.मत्स्य व्यवसायाकरीता नायलॉन जाळीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. तक्रारदार हे एका मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या संस्थेंतर्गत १५ सभासदांना नायलॉन जाळ्याचे वाटप झालेले आहे. ५० टक्के अनुदान मिळण्यासाठी मत्स्य व्यवसाय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. ५० टक्के अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) कार्यालय वाशिमचे अधिकारी सहा हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिमकडे केली होती. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी २ मे रोजी पडताळणी केली असता मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सुभाष सुखदेवे व सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे यांनी तडजोडीअंती ५५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ११ जून रोजी वाशिम येथील कार्यालयात सापळा रचला असता, दिनेश खोपे यास तक्रारादाराकडून ५५०० रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित २०१८) कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोºहाडे, पोलीस निरीक्षक ए.पी.इंगोले, पोलीस कर्मचारी नितीन टवलारकर, दिलीप बेलोकार, अरविंद राठोड, विनोद अवगळे आदींनी पार पाडली.
साडेपाच हजाराची लाच स्विकारताना सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:49 PM