सानप यांची न्यायाधीश म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयात वर्णी लागल्याचे कळताच २५ मार्च रोजी भर येथे आनंदोत्सव साजरा झाला. दरम्यान, २ जुलैपासूनच पोलीस विभागाचे पथक, श्वान पथक, बाॅम्ब निकामी पथकाने भर जहागीर येथे तपासणी मोहीम राबविणे सुरू केले होते. शनिवारी गोविंद सानप यांचा ताफा दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान कुलदैवत आसरा माता संस्थानला भेट देत असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. त्यामुळे गावाच्या प्रवेशद्वारापासून बॅन्डबाजासह फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करत गावकऱ्यांनी सानप यांना त्यांच्या घरापर्यंत नेले. नेतकरी कुटुंबातील भरच्या भूमिपुत्राने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचा सार्थ अभिमान सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
यावेळी माजी सभापती विश्वनाथ सानप, मंडळ अधिकारी टी. एस. इप्पर, माजी पोलीस पाटील प्रल्हाद फुके, अशोक गिते, महादेव क्षिरसागर, भानुदास गिते, भिमा गरकळ, रामचंद्र कोतिवार, मधुकर पतवार, शिवाजी चोपडे, धैर्यशील जोशी, सरपंच पी. के. चोपडे, तलाठी रवींद्र खंदारे, ग्रामसेवक एन. के. भुसारी, मुख्याध्यापक सुरेश मोरे उपस्थित होते.
....................
जन्मभूमीतील सत्कार अविस्मरणीय - सानप
जन्मभूमीत गावकऱ्यांकडून झालेला सत्कार हा अविस्मरणीय आहे, असे उद्गार याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे सहाय्यक न्यायाधीश गोविंद सानप यांनी काढले.