सुनील काकडे, वाशिम : दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी कारंजा ग्रामिण पोलिस स्टेशनचा सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि शिपायाने तक्रारदारास २० हजार रुपयांची लाच मागितली. ८ मे रोजी प्रत्यक्ष कार्यवाहीदरम्यान ही बाब निष्पन्न झाल्याने दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराचा त्याच्या शेतालगत असलेल्या एका शेतकऱ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. दाखल तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवदास चव्हाण आणि शिपायी निलेश थेर या दोघांनी तक्रारीची दखल घेवून आरोपिवर कारवाई करणे आणि त्यांच्याविरूद्ध दाखल तक्रारीची दखल न घेण्यासाठी २० हजार रुपयांची ‘डिमांड’ केली.
अशा आशयाच्या तक्रारीवरून ८ मे रोजी ‘एसीबी’च्या पथकाने सापळा रचून पडताळणी केली असता सहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण आणि शिपाई थेर हे दोघेही दोषी आढळून आले. त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली.