वाशिम : १ मे या महाराष्ट्र दिनी झेंडावंदनांतर राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, या दृष्टिकोनातून स्वयंसेवी संघटनांसह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केली. सोमवारीदेखील रस्त्यालगत राष्ट्रध्वज आढळल्यास ते उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवले जाणार आहेत.देशात लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वच जण १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे महाराष्ट्र दिन या दिनात स्वयंस्फुर्तीने सहभागी होतात. या दिनी वाहनांवर, घरावर, घराच्या दरवाजावर अनेक जण प्लास्टिक राष्ट्रध्वज किंवा झेंडे लावतात. अनेक विद्यार्थी व युवक दुचाकीवर राष्ट्रध्वज लावून जोरात वाहने चालवितात. हवेमुळे हे राष्ट्रध्वज खाली पडण्याची शक्यता असते. प्लास्टिक राष्ट्रध्वज खाली पडल्यानंतर त्याच रस्त्यावरून जाणारी अन्य वाहने ते राष्ट्रध्वज तुडविण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी तरूण क्रांती मंच, राजरत्न स्वयंसेवी संस्था, आयूष बहुद्देशीय स्वयंसेवी संस्था यासह अन्य स्वयंसेवी संस्थांनी गत तीन दिवसांपासून जनजागृती केली. तसेच जिल्हा प्रशासनानेदेखील प्लास्टिक राष्ट्रध्वज न वापरण्याचे आवाहन केले.घरावर लावलेले किंवा एखाद्या इमारतीवर लावलेले राष्ट्रध्वज सायंकाळी आवर्जून सन्मानाने खाली उतरवावे, असे आवाहनही केले. वैयक्तिकरित्या घरावर लावलेले राष्ट्रध्वज सायंकाळपर्यंत खाली पडणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेण्याचे आवाहनही करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र याचा अवमान कुणी करीत असल्याची तक्रार दाखल झाली तर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी संघटना सरसावल्या !
By admin | Published: April 30, 2017 7:36 PM