वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजीक ईचा नागी येथील महादेव संस्थान येथे बारस यात्रेनिमित्त अनेक वर्षांपासून शेंडीने गाडे ओढून नवस फेडण्याची परंपरा कायम आहे. २० एप्रिल रोजी बारस यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी शेंडीने गाडे ओढून आपला नवस फेडला.
यावर्षी आयोजित कार्यक्रमात हरी कीर्तन, शिवपार्वती विवाह सोहळा व त्यानिमित्त महाप्रसाद, श्रीराम जन्मावर प्रवचन, श्रीराम जन्मोत्सव सोहळा, भारुडाचा कार्यक्रम, हरी कीर्तनाचा कार्यक्रम, यात्रेच्या दिवशी २० एप्रिल रोजी सकाळी सात ते नऊ शिवपार्वती पूजा व आरती श्रीमद् भागवत ग्रंथाची पूजा करण्यात आली. तसेच लोटांगण घालणे, पाच विहिरींचे पाणी आणून पायरीवर जलाभिषेक करणे, त्यानंतर शेंडीने गाडे ओढण्याचा कार्यक्रम सुरु झाला होता. तसेच दुपारी दोन वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो महिला, पुरुष, वृद्ध, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.