वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील दाभा येथील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी २२ ऑगस्ट रोजी दाभा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद आहे की, आमचे गावातील गावाजवळ मुख्य रस्त्यावर तार कुंपणाने रोडचे नालीत पूर्णपणे उकिरडे टाकल्याने ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. तसेच शाळेतील मुला- मुलींना व गावकऱ्यांना रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
हा रस्ता पहिला ३३ फुटाचा होता, आज तो रस्ता पाच फुटाचाच राहिला आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित मोकळा करून गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात ये-जा करण्यासाठी रस्त्याची अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.