लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाचे शनिवारी जिल्ह्यात आगमन झाले. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने मिरवणुकीविना गणराय साधेपणाने घरोघरी विराजमान झाले. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, कोणते उपक्रम राबवावे, गणेश विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. गणरायाचे आगमन झाले असून, गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व स्थानिक प्रशासनाला करण्यात आल्या, असे मोडक यांनी सांगितले.
गणेशोत्सवादरम्यान गर्दी होणार नाही, याबाबत प्रशासनातर्फे कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?सार्वजनिक गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून, गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाचा वॉच राहणार आहे. तेथे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून पूजा, आरती व अन्य सोपस्कार पार पाडावे, श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, अन्य सोशल मीडियाद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
गणेश विसर्जनवेळी गर्दी होणार नाही, याबाबत कोणत्या उपाययोजना आहेत?गणेश विसर्जनवेळी भाविकांची गर्दी होणार नाही यासाठी मिरवणुका काढू नये, असा आदेश दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कृत्रिम तलावांची निर्मिती करतील. गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी गणरायांच्या मूर्ती या नगर पालिका, नगर पंचायतच्या संबंधित प्रतिनिधींकडे सुपूर्द कराव्या. सर्वांच्यावतीने नगर पालिका किंवा स्थानिक प्रशासन हे मूर्तिंचा मान, सन्मान ठेवून विसर्जन करतील. घरगुती गणेशांचे विसर्जन शक्यतोवर घरीच करावे. हे शक्य नसेल तर नगर परिषदांनी घरगुती गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली असेल तर तेथे भाविकांनी गणेश मूर्ती सुपूर्द कराव्या. यामुळे गणेश विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळता येईल.
प्रतिबंधित क्षेत्रात गणेश मंडळांना परवानगी आहे का? कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) गणेश मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात आली नाही. गणेश मंडळातर्फे श्रीगणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर एखाद्या भागात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्ण सापडल्यास, अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र संबंधातील सर्व नियम काटेकोरपणे लागू केले जातील. गणेशोत्सवादरम्यान आरोग्यविषयक जनजागृती करावी. कोरोनाविषयक संदेशाचे पोस्टर लावून नागरिकांनी दक्षता कशी घ्यावी, याचे देखावे ठेवावे. याशिवाय मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. कोरोनाच्या परिस्थितीत रक्ताची गरज असल्याने गणेश मंडळांनी सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. अधिकाधिक रक्तदात्यांनी समोर यावे.