वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेश वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात जवळपास ७ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत.या अभियानातून चालू वर्षात जिल्ह्यातील १२० गावांमध्ये २ हजार ४४० कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात ७५८ शेततळी पूर्ण झाली आहेत. धडक सिंचन व मनरेगा योजनेतून गेल्या दोन ते अडीच वर्षात पूर्ण झालेल्या सुमारे ५ हजार सिंचन विहिरींमुळे संरक्षित सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे. शेतकरी गटांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राज्य शासनाने गट शेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, वाशिम जिल्ह्यातीलसहा गटांची या योजनेसाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा तुरीची आधारभूत दराने पणन विभागामार्फत खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत बोनससह ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून याकरिता प्रकल्प सल्लागार नियुक्तीची कार्यवाही सुरु आहे. लोणी येथील श्री सखाराम महाराज संस्थानच्या विकासासाठी १० कोटी १५ लक्ष रुपयांचा आराखडा मंजूर आहे. त्यासाठी निविदा निश्चितीची कार्यवाही पूर्ण झाल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाºयांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संचालन मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी केले.