लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी (वाशिम) : बंदुकीच्या धाकावर अज्ञात चोरट्यांनी मेडशी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न १९ मार्चच्या रात्री १.३० वाजतादरम्यान केला. एटीएमचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला.येथे अकोला-हिंगोली राष्ट्रीय महामार्गाला लागून सेन्ट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. एटीएमवरील वाचमन निलेश सतीश घुगे(२५) याने फिर्याद दिली की रात्री १.३० वाजताच्या सुमारास एटीएमच्या बाहेरून एका अज्ञात इसमाने आवाज दिला की त्याला एटीमएमधून पैसे काढायचे आहेत. एटीएमचे शटर उघडले असता, एका अज्ञात इसमाने त्याच्यावर बंदूक धरली आणि दोन इसम हे गॅस कटरच्या साहायाने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत होते. ेवढ्यात एटीएमचा सायरन वाजला. हा आवाज ऐकून त्या तिघांनी तेथून पळ काढला. सायरन वाजल्याने सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयाला या धटनेची माहिती मिळताच तातडीने वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. यावरून अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, मालेगाव ठाणेदार आधारसिंग सोनुने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बनसोडे, सायबर सेल पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रवीण खंदारे,स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल मोडकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंवी कलम ३०७, ३४२, ३७९, ५११, ३४ सहकलम ४/२५ आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेºयात चोरटे कैद झाले असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बनसोडे, पोलीस गजानन टाले करीत आहेत.
बंदुकीच्या धाकावर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 4:00 PM