लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढावी, शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, गळतीचे प्रमाण कमी होणे आदी उद्देशातून वर्ग पहिली ते चवथीमधील एस.सी., भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींना मिळणारा उपस्थिती भत्ता कोरोनाचे कारण सांगून शासनाने स्थगित केला आहे. याचा फटका जिल्ह्यातील १२५०० विद्यार्थिनींना बसला. राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थिनींना प्रतिदिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. शाळेत ७५ टक्के उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थिनींना याचा लाभ देण्यात येतो. सन २०२०-२१ मध्ये कोरोनाचे कारण सांगून शासनाने हा उपस्थिती भत्ता स्थगित केला आहे. जिल्ह्यात अनु. जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींची संख्या जवळपास १२ हजार ५०० आहे. यासाठी २५ लाखांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, आता उपस्थिती भत्ता स्थगित करण्याचे शासन आदेश असल्याने जिल्ह्यातील १२ हजार ५०० विद्यार्थिनींना याचा फटका बसला आहे.
वाशिम जिल्ह्यात एस.सी., एस.टी., भटक्या जमाती या प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील १२ हजार ५०० विद्यार्थिनी आहेत. प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता दिला जातो. वरिष्ठांच्या आदेशानुसार उपस्थिती भत्त्याला स्थगिती मिळाली.- अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक)