राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थिनींना प्रतिदिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. शाळेत ७५ टक्के उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थिनींना याचा लाभ देण्यात येतो. सन २०२०-२१ मध्ये कोरोनाचे कारण सांगून शासनाने हा उपस्थिती भत्ता स्थगित केला आहे. जिल्ह्यात अनु. जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींची संख्या जवळपास १२ हजार ५०० आहे. यासाठी २५ लाखांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, आता उपस्थिती भत्ता स्थगित करण्याचे शासन आदेश असल्याने जिल्ह्यातील १२ हजार ५०० विद्यार्थिनींना याचा फटका बसला आहे.
०००
भत्ता बंद झाल्याने विद्यार्थिनींचा हिरमोड
शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता उपस्थिती भत्ता दिला जातो. यंदा हा भत्ता मिळणार नसल्याने विद्यार्थिनींचा हिरमोड झाला.
उपस्थिती भत्ता बंद करू नये, असे मत विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
०००००
दिवसाला एक रुपया; तोही केला बंद
एस.सी., एस.टी., भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिवसाला एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता दिला जातो.
यामुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळून शाळेतील उपस्थिती वाढते.
मात्र, हा भत्ताही बंद करण्यात आल्याने नाराजीचा सूर आहे.
०००
विद्यार्थिनींना दिला जायचा भत्ता
अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढावी याकरिता उपस्थिती भत्ता दिला जात होता. जिल्ह्यातील १२५०० विद्यार्थिनी यासाठी पात्र आहेत. यंदा उपस्थिती भत्ता मिळणार नाही.
००
महागाईच्या काळात उपस्थिती भत्त्याची रक्कम फारच तोकडी आहे आणि ती रक्कमही कोरोनाचे कारण सांगून दिली जात नसेल तर ही बाब अन्यायकारक म्हणावी लागेल. विद्यार्थिनींचा हिरमोड होऊ नये म्हणून उपस्थिती भत्ता देण्यात यावा.
- डाॅ. नरेशकुमार इंगळे, सामाजिक कार्यकर्ते
००
वाशिम जिल्ह्यात एस.सी., एस.टी., भटक्या जमाती या प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील १२ हजार ५०० विद्यार्थिनी आहेत. प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता दिला जातो. वरिष्ठांच्या आदेशानुसार उपस्थिती भत्त्याला स्थगिती मिळाली.
- अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)वाशिम
००
दरवर्षी शाळेत उपस्थित राहिल्यानंतर दर दिवशी एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता मिळत होता. यावर्षी अजून पैसे मिळाले नाहीत. आमचे पैसे आम्हाला मिळायले हवे.
- सायली वानखडे, विद्यार्थिनी
चिखली, ता. रिसोड
००
शाळेत उपस्थित राहिल्यानंतर शाळेमध्ये उपस्थिती भत्ता म्हणून आम्हाला पैसे मिळत होते. कोरोनापासून आम्हाला उपस्थिती भत्त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
- करुणा भगत, विद्यार्थिनी
चिखली, ता. रिसोड