वाशिम: जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीची तारीख कधी घोषित होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ३0 जून रोजी संपणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने युती केली तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अपवाद वगळता अन्य पक्षांना दोन अंकी आकडाही गाठला आला नाही. १७ जागा घेऊन काँग्रेस हा पक्ष जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. ऐन निवडणुकीच्या काळातच गटबाजी उफाळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षांंचा कार्यकाळ येत्या ३0 जून रोजी संपत असल्याने आता निवडणूक होणार आहे. निवडणुकीची तारीख काय? याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे. दरम्यान, २0१४ मधील विधानसभा निवडणुकीने जिल्हा परिषद सदस्य संख्येतही उलथापालथ केली. जि.प. सदस्य विश्वनाथ सानप दाम्पत्य मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेचे संख्याबळ १0 झाले तर मालेगाव जिल्हा परिषद गट बाद झाल्याने मनसेचे संख्याबळ एक वर आले. २0१३ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव होते. अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या सोनाली जोगदंड तर उपाध्यक्ष म्हणून राकाँचे चंद्रकांत ठाकरे हे कामकाज पाहत आले आहेत. आता सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत निघाल्याने चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसकडे स्वत:चे १७ आणि दोन अपक्ष असे १९ संख्याबळ आहे तर मित्र पक्ष असलेल्या राकाँकडे आठ सदस्य असल्याने काँग्रेस-राकाँ-अपक्ष ही आघाडी पुन्हा विराजमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शिवसेना व भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेत सत्तापालट करण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणीला वेग दिल्याने आणि सोबतीला एका पक्षाच्या ह्यबह्ण गटाशी बोलणी सुरूच ठेवल्याने ऐनवेळी धक्कादायक निकाल येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अध्यक्षपदाच्या निवडणूक तारखेकडे लक्ष
By admin | Published: June 17, 2016 2:30 AM