लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीदरम्यान अटी-तटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतींमधील लढतीकडे मतदारांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच उमेदवारांचे लक्ष लागले असून, गावागावांत याविषयी चर्चा झडत आहेत.
रिसोड तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीकडे लक्ष
रिसोड : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी १८ जानेवारी रोजी सकाळपासून रिसोड तहसील कार्यालयात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून, या ३२ ग्रामपंचायतींपैकी महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमधील निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
रिसोड तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असून एका फेरीत तीन ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीदरम्यान तालुक्यातील महत्त्वपूर्ण आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाकडून ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना १७ जानेवारी राेजी मतमोजणीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे देण्यात आले. मतमोजणीदरम्यान प्रशासनाकडून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रिसोड पोलीस स्टेशन ठाणेदार एस. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात रिसोड पोलीस विशेष दक्षता घेत आहे.