वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेले १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळण्यासाठी आतापर्यंत १९६ ऑटोरिक्षामालकांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, यापैकी १०६ जणांच्या बँक खात्यांवर अर्थसाहाय्य जमा करण्यात आले.
एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी केली होती. कडक निर्बंध कालावधीत परवानाधारक ऑटोमालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी परवानाधारक ऑटोरिक्षामालकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. आतापर्यंत १९६ जणांचे अर्ज आले. त्यापैकी १०६ अर्ज मंजूर झाल्याने त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली, तर ९० अर्ज नामंजूर झाले. जिल्ह्यात तीन हजारांच्या आसपास परवानाधारक ऑटोरिक्षा असून, अर्थसाहाय्य योजनेसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. अधिकाधिक परवानाधारक ऑटोरिक्षामालकांना लाभ मिळावा, याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात विशेष कक्षाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. तरीदेखील अर्थसाहाय्य योजनेसाठी ऑटोरिक्षामालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
००००००
बॉक्स
स्वतंत्र काउंटरची सुविधा
राज्य शासनाच्या अर्थसाहाय्य योजनेचा लाभ अधिकाधिक ऑटोरिक्षामालकांना व्हावा, याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात स्वतंत्र काउंटरची सुविधादेखील उपलब्ध केली आहे. ऑनलाइन माहिती भरताना काही अडचणी आल्यास किंवा आधारकार्ड हे मोबाइल क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी या स्वतंत्र काउंटरमध्ये ऑटोरिक्षामालकांना मार्गदर्शनही करण्यात येते. गत आठ दिवसांपासून या कक्षात कुणीही अर्ज घेऊन आले नसल्याची माहिती आहे.
000000000000000000
कोट बॉक्स
राज्य शासनाने जाहीर केलेल्या १५०० रुपये अर्थसाहाय्याचा ऑॅटोरिक्षामालकांना लाभ देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची सुविधादेखील उपलब्ध केली. आतापर्यंत १९६ जणांचे ऑनलाइन अर्ज आले असून, त्यापैकी अर्ज मंजूर झालेल्या १०६ जणांच्या बँक खात्यांत अर्थसाहाय्याची रक्कम जमा करण्यात आली.
- ज्ञानेश्वर हिरडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम
०००००००००००
एकूण नोंदणीकृत ऑटोरिक्षा ३०००
एकूण प्राप्त अर्ज १९६
मंजूर अर्ज १०६
नामंजूर अर्ज ९०