वाशिम : गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २९ मीमी पाऊस झाला असून, यामुळे खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा अजून कायम असल्याचे दिसून येते.
गत वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानाच्या धक्क्यातून सावरत यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी आटोपली आहे. पेरणी आटोपल्यानंतर अधूनमधून पाऊस झाला. मात्र, गत २० दिवसांपासून दमदार पाऊस नसल्याने खरिपाची पिके संकटात सापडली. ७ जुलैच्या रात्रीदरम्यान थोडाफार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. १० जुलैच्या रात्रीदरम्यान जिल्ह्यात सरासरी २९ मीमी पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली. सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात ५५.४० मीमी झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असून त्याखालोखाल तूर, कपाशी, मूग व उडदाचा पेरा आहे. दमदार पाऊस नसल्याने सिंचन प्रकल्प, नदीनाले अजूनही तहानलेलेच आहेत. पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
००००
रिसोड, मंगरूळपीरमध्ये कमी पाऊस
गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २८.९० मीमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात ५५.४० मीमी, तर सर्वात कमी पाऊस रिसोड तालुक्यात १६.७० मीमी झाला. मंगरूळपीर तालुक्यातही १७.९० मीमी पाऊस झाला. सिंचन प्रकल्प, विहिरींमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
०००००
तालुकापाऊस (मीमी)
वाशिम ३१.०
रिसोड १६.७०
मालेगाव ५५.४०
मं.पीर १७.९०
मानोरा २४.१०
कारंजा २५.४०