वाशिम : कोविड रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असून, तक्रारीनुसार जिल्ह्यातील केवळ एका रुग्णालयाचेच ऑडिट करण्यात आले. रुग्णाकडून अतिरिक्त शुल्क घेतल्याचे निष्पन्न झाल्याने जवळपास २४० रुग्णांना अतिरिक्त घेतलेले पैसे परत करण्यात आले.
देशात साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा आलेख उंचावल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जवळपास १० खासगी कोविड रुग्णालयाला परवानगी दिली. खासगी कोविड रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या राज्यभरात अनेक तक्रारी होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. वाशिम येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत झालेली आहे. खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून दर आकारणी कशी करावी, याच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभाग व राज्य शासनाने जारी केलेल्या आहेत. प्राप्त तक्रारीनुसार जिल्ह्यात एका रुग्णालयाचे ऑडिट करण्यात आले.
०००
बॉक्स
ऑडिटमध्ये आढळल्या होत्या त्रुटी
रुग्णांकडून उपचारानुसार किती देयक आकारावे याबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार एका रुग्णालयाने रुग्णांना देयक न आकारता जादा शुल्क वसूल केल्याचे ऑडिटमध्ये आढळून आले होते. अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानुसार अतिरिक्त शुल्क संबंधित रुग्णांना परत करण्यात आले.
०००
बॉक्स
प्राप्त तक्रारीची केली जाते पडताळणी
जिल्हास्तरीय समितीत महसूलच्या अधिकाऱ्यांबरोबरच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचादेखील समावेश असतो. रुग्ण किंवा नातेवाईक यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली तर त्यानुसार चौकशी व पडताळणी केली जाते.
000
बॉक्स
रुग्णांना ५० हजारावर बिल
खासगी कोविड रुग्णालयात उपचारानुसार ५० हजार ते दोन लाखांपर्यंत देयक आकारले जाते. काही रुग्णालयांत प्रत्येक रुग्णाकडून डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पीपीई किटसाठी लागणारा खर्चही वसूल केला जात असल्याची माहिती आहे. शासकीय नियमानुसार दर आकारणी व्हावी, अशी अपेक्षा रुग्ण व नातेवाईक बाळगून आहेत.
००
कोट बॉक्स
खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून किती दर आकारणी करावी, याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार दर आकारणी होत नसेल तर संबंधित रुग्ण किंवा नातेवाइकांना जिल्हास्तरीय समिती किंवा आरोग्य विभागाकडे तक्रार करता येते. या तक्रारीनुसार चौकशी व पडताळणी केली जाते. चौकशीअंती दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाते.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक