लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर महिला आणि ६ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना घरपोच पोषण आहार पोहोचविण्याच्या किंवा शक्य नसेल, तर धान्य, अंडी पोहोचविण्याचा वा त्यांच्या खात्यात पोषण आहाराची रक्कम जमा करण्याचे निर्देश राज्य शासनच्या आदिवासी विकास विभागााने ३१ मार्च रोजी दिले होते. तथापि, अमरावती विभागात याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे.सध्या राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनची अमलबजावणी होत आहे. या परिस्थतीत अनुसूचित क्षेत्रातील गरोदर व स्तनदा मातांसह ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना अमृत आहार योजनेंतर्गत नियमित आहार व अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर, स्तनदा मातांना हा आहार घरपोच देण्याबाबत क्षेत्रीयस्तरावरून मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ३१ मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अमृत आहार योजनेंतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर महिला, स्तनदा माता यांना गरम, ताजा आहार महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा उमेदकडून स्थापित बचत गट, स्वयंपाकी, मध्यवर्ती स्वयंपाकगृह यांच्यामार्फत तयार करून लाभार्थ्यांना घरपोच डबा पोहोचविणे, तसेच ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना एक आठवडा पुरेल इतकी केळी, अंडी पोहोच करावी, ज्या ठिकाणी उपरोक्तप्रमाणे अमलबजावणी शक्य नाही, अशा ठिकाणी सदर पोषण आहार घटकातील धान्य लाभार्थ्यांना एकत्रित पाकिटे तयार करून महिनाभर पुरेल एवढा उपलब्ध करून द्यावा किंवा उपरोक्त दोन्ही प्रमाणे अमलबजावणी शक्य नसल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प यांनी त्याबाबतचा आढावा घेऊन आहाराची एक महिन्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश देण्यात आले होते. तथापि, १० दिवस उलटूनही अमरावती विभागात याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थी महिला आणि बालक पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.
अमृत आहार योजनेंतर्गत घरपोच आहार अमलबजावणीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:20 PM