लोकमत न्युज नेटवर्क काजळेश्वर उपाध्ये [वाशिम] : वाशिम जिल्ह्यालगतच्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे वाशिम जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रवेशबंदी कडक केली आहे. या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतच्यावतीने २७ एप्रिलपासून सकाळी ८ ते १२ या वेळेत फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्यात गावात छुप्या मार्गाने येणाºयांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यासह प्रशासनाच्या सूचना ग्रामस्थांपर्यत्त पोहोचविण्यात येत आहेत..कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांनी केलेल्या नियोजनानुसार कारंजा ग्रामीण पोलीस तथा पोलीस उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या समन्वयातून परजिलह्यातून होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी चेकपोस्ट वाढविण्यात आल्या आहेत. त्यात जानोरी, खानला, खानापूर मार्गावर चेकपोस्ट सुरू केल्याने छुप्या मार्गाने होणारी वाहतूक थांबण्यास मदत झाली आहे. यानंतरही गावात छुप्या पद्धतीने कोणी प्रवेश केला, तर गावची दक्षता समिती, पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासनास कळवावे, तसेच गाव कोरोना विषाणू संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतच्यावतीने फिरत्या व्हॅनद्वारे ग्रामस्थांना करण्यात येत आहे. त्याशिवाय सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, अशी लक्षणे दिसताच कारंजा येथी ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये तपासणी करावी. अत्यावश्यक वेळी बाहेर पडायचे झाल्यास तोंडाला मास्क, रुमाल बांधावा, अशा सूचना सदर व्हॅनमधून गावकºयांना देण्यात येत आहेत.
काजळेश्वरात फिरत्या ‘व्हॅन’द्वारे कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 4:43 PM