अभयारण्यात लागलेल्या आगीमुळे जंगलाची होणारी हानी लक्षात घेता वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी मनोजकुमार खैरनार, काटेपूर्णा अभयारण्याचे वनाधिकारी पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, तसेच रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील फेट्रा तसेच लगतच्या वनोजा, भूर, कासमार, वाघा आदी गावांत वनविभागाचे कर्मचारी व रासेयोच्या सदस्यांनी गावकऱ्यांना माहिती देऊन व्यापक जनजागृती केली. यावेळी सदस्यांनी चेहऱ्यावर बिबट्याचे मुखवटे रंगवून बिबटे वाचवा, माझे घर जाळू नका, असा आगळावेगळा संदेश दिला. जंगलाला लागलेल्या आगीमध्ये बहुगुणी वनौषधी, कीटक, सरपटणारे प्राणी, वन्यप्राणी, तृणभक्षी प्राणी, पक्षी, त्यांची अंडी व घरटे जळून खाक होतात. त्यातून निसर्गाची प्रचंड हानी होते. जंगलास आग लागलेली दिसल्यास तत्काळ वनविभागाला संपर्क करावा, अभयारण्याच्या लगतच्या शेतकऱ्यांनी शेताचे धुरे जाळताना खबरदारी घ्यावी व आग लागल्यास ती विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वनरक्षक खोडके, वनरक्षक डुकरे, प्रा. घोंगटे व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच रोसेयोच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
अभयारण्य परिसरात वनवणव्याबाबत जनजागृती, वृक्षारोपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:35 AM