वाशीम : कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमाची व्याप्ती संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रात असून, प्रक्षेत्र वरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दत्तक गावे निवडून त्या गावामध्ये गरजेनुरूप प्रसार करण्याच्या हेतूने सन २०२१,२२ पासून पुढील तीन वर्षांकरिता जिल्ह्यातील सात गावांचे दत्तक ग्राम म्हणून निवड केली आहे. याच औचित्याने शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी वाशिम तालुक्यातील मौजे पार्डी टकमोर येथील पारेश्वर संस्थान सभागृहात जनजागृती व कृती आराखडा शिबिर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक मधुकरराव उगले, तर प्रमुख पाहुणे राजुभाऊ चौधरी (तं. मुक्ती अध्यक्ष) यांची उपस्थिती लाभली. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, दत्तक गावचे समन्वयक एस. के. देशमुख, शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख, डॉ. डी. एल. रामटेके व शुभांगी वाटाणे या वेळेस प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकात एस. के. देशमुख यांनी दत्तक गावाची संकल्पना व या माध्यमातून पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून व्यावसायिकतेला जोड देण्याच्या उद्देशाने पुढील तीन वर्षांकरिता दत्तक गावामध्ये तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम करडा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांसोबत शास्त्रज्ञांनी संवाद साधून गावातील संसाधने, जमिनीचा प्रकार, सिंचन स्रोत, पूरक व्यवसाय करणारे शेतकरी, महिला बचत गट, फळबाग ई.बाबीवर माहिती घेऊन या सूक्ष्म नियोजनातून गावाचा कृती आराखडा तयार करणार, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. आर. काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उत्तम शेती व प्रयोगशीलता जोपासण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप प्रशिक्षण प्रात्यक्षिक व चाचण्या घेणार असणार असे सांगितले. तांत्रिक मार्गदर्शनात शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख, डॉ. डी. एल. रामटेके, शुभांगी वाटाने यांनी आपल्या विभागाशी निगडित उपलब्ध तंत्रज्ञान व पुढील वाटचाल याविषयी सखोल उद्भोधन केले. राजूभाऊ चौधरी यांनी याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राला संपूर्ण सहकार्य उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव उगले यांनी स्वतःच्या अनुभवातून प्रशिक्षणाचे फायदे व गरजेनुरूप ज्ञानाचा लाभ घेऊन उद्योगशीलता जोपासावी, असे आवाहन करून पैसा असून, फायदा होत नसून योग्यज्ञानाची गरज जीवनात मोलाचा बदल घडवू शकतो, असे सांगितले. कृषी सहायक दुगाने यांनी सुद्धा कृषी विभाग योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अंति शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन सुद्धा करण्यात आले. गावात शिवार फेरी घेतल्यानंतर उत्तम श्रावण कांबळे, संजय गायकवाड यांच्या शेतातील व्यावसायिक बॉयलर कुक्कुटपालन युनिटला सुद्धा भेट देण्यात आली. तसेच कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांचा व्हाट्सॲप ग्रुप सुद्धा तयार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. देशमुख यांनी व आभार प्रदर्शन दिनेश चौधरी यांनी केले.