...................
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी संकट पूर्णत: टळलेले नाही. असे असताना मुख्य बाजारपेठेसह अन्य ठिकाणी नागरिक बेफिकिर वावरत आहेत. ही बाब गंभीर असून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
................
डासांचा प्रादुर्भाव; पालिकेचे दुर्लक्ष
वाशिम : शहरातील विविध भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून हा प्रकोप बळावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक धूर फवारणीकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी आकाश शिंदे यांनी शुक्रवारी केली.
..................
सॅनिटायझर विक्रीत प्रचंड घट
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी निवळले आहे. नागरिकही पूर्वीप्रमाणे आपापल्या पद्धतीने व्यवहारांमध्ये गुंतले आहेत. यादरम्यान तोंडाला मास्क लावणे किंवा हाताला सॅनिटायझरचा वापर करणे बंद झाले आहे. परिणामी, सॅनिटायझर विक्रीत प्रचंड घट झाल्याची माहिती काही औषध विक्रेत्यांनी दिली.
..............
बंदोबस्तावरील पोलिसांचा खडा पहारा
वाशिम : जिल्हाभरात रविवारी गणेश विसर्जन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला असून गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला ठिकठिकाणी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी खडा पहारा देत असल्याचे दिसून आले.
....................
‘भारत नेट’च्या कामांना गती देण्याची मागणी
वाशिम : भारत नेट योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र इंटरनेट जोडणीची कामे संथ गतीने सुरू असल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होत असून कामकाज खोळंबत आहे. या कामांना संबंधित यंत्रणेने गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
................
पीडित व्यक्तींच्या पुनर्वसनाची मागणी
वाशिम : अॅट्रॉसिटी पीडित व्यक्तींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा प्रकरणात हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबातील व्यक्तीला नोकरी द्यावी, त्यांचे पुनर्वसन करावे, आदी मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सहसचिव पी.एस. खंदारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केले.
................
रस्त्याची दुरुस्ती; वाहनचालकांना दिलासा
वाशिम : शहरातील पोस्ट आफिस चौकापासून पुसद नाक्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसत आहे.