लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु (वाशिम) .: धनज येथून जवळच असलेल्या रहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत अतिशय शिकस्त झाली आहे. सततच्या पावसामुळे ही ईमारत कोसळण्याची भिती असून, आरोग्य विभागाकडे या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठविण्यात आला; परंतु अद्यापही या गंभीर ईमारतीच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. आता येथील डॉक्टरांचीही बदली करण्यात आली असून, दवाखान्याचे कामकाजच बंद झाल्याने ग्रामीण रुग्णांची पंचाईत झाली आहे. कारंजा तालुक्यातील धनज बु. पासून जवळच असलेल्या रहाटी येथे २० वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णांवर उपचारासाठी आयुर्वेदिक दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी आणि एक परिचर अशी दोनच पदे मंजूर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून येथील परिचराचे पद रिक्त झाले असल्याने वैद्यकीय अधिकारीच रुग्णांवर उपचार करण्याचे सर्व सोपस्कार पार पाडत होते. या दवाखान्याच्या इमारतीची अवस्था खूपच गंभीर आहे. इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या तडा गेल्या आहेत. दारे, खिडक्या खिळखिळ्या झाल्याचे दिसत आहे. शौचालय, प्रसाधनगृहाची अवस्थाही गंभीर आहे. एखादवेळी वादळी वारा आल्यानंतर या दवाखान्याची इमारत कोसळून जिवित हानी होण्याची भिती आहे. आता ही ईमारत शिकस्त असल्याने दुरुस्तीची दखल घेण्यात आली नाहीच उलट. येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेव करेवाड यांचीच बदली करण्यात आली. या इमारतीच्या स्थितीबाबत त्यांनी वेळोवेळी वरिष्ठस्तरावर अहवालही पाठविला; परंतु अद्याप त्याची दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या ईमारतीची आपण स्वत: पाहणी केली आहे. ही ईमारत दुरुस्ती करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे सदर ईमारत पाडून तेथे वी ईमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आहे. त्यामुळेच येथील डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे.-डॉ. एस. आर. नांदेतालुका आरोग्य अधिकारी, कारंजा
आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 4:53 PM