वाशिम : तालुक्यातील बाभुळगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बाली लखन पवार या महिलेची रस्त्यावरच साड्या लावून प्रसूती करण्याचा प्रसंग कुटुंबियांवर ओढवला. आरोग्य सेविकेने महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.बाभूळगाव येथील बाली लखन पवार या महिलेस बुधवारी सायंकाळी प्रसव कळा सुरू झाल्यानंतर नातेवाईक महिलांनी वारला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी नेले. त्यावेळी तेथे कार्यरत आरोग्य सेविकेने या महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य उपकेंद्राबाहेर फाटकाजवळ साड्या लावून या महिलेची प्रसूती करावी लागली. या प्रकारामुळे बाळंतीनीचा जीवही धोक्यात आला होता, असा आरोप महिलेच्या कुटंूबियांनी केला. या संदर्भात चौकशी करण्यासाठी गेलेले सरपंच आणि उपसरपंचांना आरोग्य सेविकेच्या कुटुंबियांनी उर्मट वागणूक दिली, असा गंभीर आरोपही कुटुंबियांनी केला असून, रस्त्यावर प्रसूती झालेल्या कापडांचे आरोग्य केंद्रात नेऊन फोटो काढून प्रसूती आरोग्य उपकेंद्रात झाल्याचे आरोग्य सेविकेने केल्याचे भासवले, अशी माहिती गावच्या सरपंचानी दिली. दरम्यान, या महिलेची प्रसूती आरोग्य केंद्रातच केली असून, त्या प्रक्रियेचे छायाचित्र आणि व्हिडिओसुद्धा असल्याचा दावा आरोग्य सेविकेने केला. विशेष म्हणजे या आरोग्य उपकेंद्रातील गैरसोयीबद्द्ल यापूर्वीही जिल्हा आरोग्य अधिकारी व तत्सम प्राधिकरणाकडे उपसरपंच सुभाष कालापाड यांनी तक्रार केली होती.
बाली पवार या महिलेची आरोग्य उपकेंद्रात आम्हीच प्रसूती केली. त्या प्रक्रियेचे व्हिडिओ आणि फोटोही आमच्याकडे आहेत. या संदर्भातील चौकशीदरम्यान आम्ही ते सादर करू. या महिलेच्या कुटूंबियांनी प्रसूतीनंतर तिला बाहेर नेऊन व्हिडिओ व फोटो काढले आणि तुमची बदली करण्यासाठी आम्ही असे करीत असल्याचे सांगितले.- कामिनी कांबळे (आवारे)आरोग्य सेविका, बाभूळगाव