लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रसुतीनंतर जन्माला येणाºया बालकांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ठराविक साहित्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मणाºया बालकांना २ हजार रुपये किंमतीचे साहित्य असलेली ‘बेबी केअर कीट’ पुरविण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारीपासून सर्वत्र केली जाणार आहे. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदरपणीच नाव नोंदणी केलेल्या व त्याचठिकाणी प्रसुत झाल्यानंतर २ महिन्याच्या आत अर्ज सादर करणाºया महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर ‘बेबी केअर कीट’ पुरविली जाणार आहे. त्यात नवजात बालकाचे कपडे, प्लास्टिक लंगोट, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, तापमापक यंत्र, २५० मीली अंगाला लावायचे तेल, मच्छरदाणी, छोट्या आकाराचे ब्लँकेट, लहान प्लास्टिकची चटई, ६० मीली शाम्पू, खेळणी-खुळखुळा, नख काढण्याकरिता नेलकटर, हातमोजे-पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्विड, सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग आदी साहित्यांचा समावेश असणार आहे.
‘बेबी केअर कीट’संदर्भातील शासन निर्णय प्राप्त झाला आहे. बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही बाब सर्वांगाने फायदेशीर ठरणार असून शासनाच्या दिशानिर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- नितीन मोहुर्लेमहिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम