शिरपूर जैन : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण घटत असतानाच, आता कोरोना चाचणी आणि लसीकरणाकडे लोक पाठ करीत आहेत. कोरोना संसर्गाची भीती लोकांच्या मनातून कमी झाल्याने शिरपूर परिसरात १ जूनपासून २५० जणांनी लस घेतल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून शिरपूर येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. त्याशिवाय कोरोना चाचणीलाही वेग देण्यात आला. त्यानंतरही गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. कोरोना संसर्गामुळे गावातील जवळपास सात ते आठ जण मृत्यू पावल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यामुळे जनतेत कोरोनाची धास्तीच पसरली होती; परंतु जून महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने घटली. बाधितांची संख्या घटत असल्याने लोकांच्या मनातील कोरोनाची भीती बरीच कमी झाली, परिणामी त्यांनी कोरोना चाचणीकडे पाठ केली. मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू असताना शिरपूर येथे कोरोना लसीकरणासाठी लोकांची धडपड पाहायला मिळत होती; परंतु आता मात्र चाचणीबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसत असून, आरोग्य विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून शिरपूर येथील केवळ २५० जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
------------
१५ दिवसात केवळ ९२ चाचण्या
कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ केली असतानाच, चाचणीबाबतही लोक गंभीर दिसत नसून, १५ दिवसात गावातील केवळ ९२ जणांनी कोरोना चाचणी केल्याचे, आरोग्य विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी २ जून रोजी एक, तर १४ जून रोजी बाहेरगावातील पाहुणा आलेला एक बाधित असल्याचे आढळून आले. चाचण्यांबाबत नागरिकांची उदासीनता गंभीर असून, धोका अद्याप संपला नसल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
------------------
खरीप हंगामाचाही परिणाम
कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने कोरोना चाचणी आणि लसीकरणाबाबत जनता गंभीर नसल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी, सध्या सर्वत्र खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह बहुतांश कामगार या हंगामात व्यस्त आहेत. अगदी सकाळी शेतात जाणारी ही मंडळी सायंकाळी उशिरा घरी पोहोचतात. त्यामुळे दिवसभर गावांत शुकशुकाटच राहत आहे. याच कारणामुळेही लसीकरण आणि चाचण्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
-------------
शिरपुरातील लसीकरणाची स्थिती...
लस - पहिला डोस - दुसरा डोस
कोव्हॅक्सिन - ४३५५ - ३६२९
कोविशिल्ड - २३२७ - २००
======================