गेल्या काही महिन्यांपासून अकोला-आर्णी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी बेलोरानजीकच्या नाल्यावर पुलाची उभारणी करण्यात येत आहे. या कामामुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून कंत्राटदार कंपनीने पुलाच्या खालच्या भागात कच्चा रस्ता तयार केला असून, या रस्त्यानेच पुसदकडून येणारी आणि पुसदकडे जाणारी वाहने धावत आहेत. गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी असलेली मजिप्राची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने येथे गटार तयार झाले आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाली. यामुळे या ठिकाणाहून चालकांना मार्ग काढणेच कठीण झाले आहे. रस्त्यावर पडलेला खड्डा चुकविताना एका ट्रकचा पट्टा तुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यातच बंद पडून या रस्त्यावरील वाहतूक दोन तास खोळंबली. यावेळी रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरापर्यंत दिग्रस व मानोराकडून येजा करणाऱ्या खासगी वाहनांसह एसटी बसेसची रांगच लागली होती.
पाण्याचाही मोठा अपव्यय
बेलोरानजीक पुलाच्या खालील मजिप्राची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहेच, शिवाय फुटलेल्या जलवाहिनीमधून दरदिवशी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच या ठिकाणाहून जलवाहिनीत घाण शिरून ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठाही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या ठिकाणी जलवाहिनीचे पाणी साचून गटार तयार झाल्यानेच चालकांना मार्ग काढताना रस्त्याच्या अंदाज घेता येत नाही. त्यामुळे येथे एखादवेळी मोठा अपघात घडण्याची भीती आहे.