लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेल्या बडनेरा - वाशिम रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार या रेल्वे मागार्चा प्रस्ताव तयार करण्यात आला असून डिसेंबर २०२० अखेरपर्यंत रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांना सादर होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे नागपूर मंडळ समितीचे अध्यक्ष पद्श्री खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नरखेड-बडनेरा-वाशिम रेल्वेमार्ग विस्तार कृती समितीच्या पदाधिकाºयांसोबत डॉ. दीपक ढोके यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत दिली.खासदार डॉ. विकास महात्मे हे शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी वाशिम येथे नरखेड-बडनेरा-वाशिम रेल्वेमार्ग विस्तार कृती समिती वाशिम पदाधिकारी डॉ दीपक ढोके, नगरसेवक बाळूभाऊ मुरकुटे यांच्यासह पदाधिकाºयांशी संवाद साधला. डॉ महात्मे म्हणाले, वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योगधंदे उभारल्या शिवाय पर्याय नाही. जिल्ह्याचा उद्योगाच्या माध्यमातून विकास व्हावा या करिता शासनाने जिल्ह्यात जवळपास ३०० हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी संपादित केली; परंतु उद्योगासाठी आवश्यक दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे अपेक्षित उद्योग सुरु होवू शकले नाहीत. त्यासाठी हा रेल्वे मार्ग होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने सन २०१५ मध्ये मागासलेल्या व अविकसीत जिल्ह्याचा विकास करण्याचे धोरण निश्चीत केले आहे. रेल्वेने सन २०१६-१७ मध्ये या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले होते. आता सर्वेक्षण पुर्ण होवून प्रस्ताव तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांना सादर होणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या रेल्वे मागार्ची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरावी, असे आवाहन देखील डॉ. महात्मे यांनी केले. यावेळी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष सचिन कुळकर्णी, हरीश खुजे, डिगांबर खोरणे, प्रणव बोलवार, धीरज शर्मा, वैभव रणखांब यांच्यासह इतर पदाधिकारी होते.