लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सिंचनाचा अनुशेष कमी करण्यासाठी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तरसावंगी येथे उभारल्या जाणाºया बलून बॅरेजेसचा प्रश्नही अद्यापपर्यंत प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बोरव्हा, घोटा शिवणी आणि सत्तर सावंगी अशा तीनठिकाणी बलून पद्धतीच्या बॅरेजेसची कामे केली जाणार होती. त्याचा सुधारित प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला; मात्र, याबाबत शासनस्तरावरून कुठलीच ठोस हालचाल झालेली नाही. याशिवाय एकबुर्जी प्रकल्पाच्या सांडव्याची उंची एक मीटरने वाढविण्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. खडकी, गोंडेगाव, पांगराबंदी, इंगलवाडी, स्वासीन, पळसखेड आदी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे, सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमांतर्गत माळेगाव संग्राहक, शेलगाव संग्राहक व रापेरी संग्राहक तलावांच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब देखील शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. याकडे जलसंपदा विभागाने लक्ष पुरवून शेतकºयांचा सिंचनाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी जोर धरत आहेत.
शासनाचे आश्वासन हवेतच विरले!राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेले कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे टिकले नाहीत. अनेक प्रकल्पांवर उभारलेल्या कोल्हापूरी बंधाºयाच्या पाट्याच चक्क चोरीला गेल्याचेही प्रकार उघडकीस आले. त्यावर पर्याय म्हणून प्रामुख्याने परदेशात वापरले जाणारे अद्ययावत बलून बंधारे उभारण्याचे आश्वास काही महिन्यांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात ३ ठिकाणी हे बंधारे उभारण्याची बाब प्रस्तावित होती. प्रत्यक्षात मात्र हा प्रश्न अद्याप प्रलंबित असून पुढेही याबाबत अनिश्चितता असल्याचे सूत्रांनी सांगितले.