- प्रफुल बानगावकर
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानातर्गंत बांबर्डा येथील शिवकालीन तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० हजार मिटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
मागील तीन वर्षांपासून पडत असलेल्या अल्प पावसामुळे कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वाशिम जिल्ह्यासह कारंजा तालुक्यातील गावागावातील लोक पाणी टंचाईच्या झळा सोसत आहेत. यावर मात करण्यासाठी संपूर्ण राज्यात शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानात सुरूवातीपासून पुढील पाच वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने गावांचा समावेश करण्यात आला. कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड या गावाचा सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानात समावेश करण्यात आला. त्या अंतर्गत सदर गावात जवळपास ५० हजार मिटर लांबीचे जलसंधारणाचे कामे पूर्णत्वाकडे जाण्याच्या मार्गावर असून झालेल्या खोलीकरणाच्या कामामुळे पाणीसाठ्यात वाढ होवून संभाव्य पाणीटंचाईवर मात केल्या जाईल. बांबर्डा कानकिरड हे जवळपास १२०० लोकवस्तीचे गाव असून, या गावाला पूर्व व पश्चिम या दिशांना असणारया शिवकालीन तलावाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परंतू सदर तलावाचे बरेच दिवसांपासून खोलीकरण न झाल्याने तलाव संपूर्णपणे गाळले गेले होते. परिणामी या तलावात जलसाठा राहत नव्हता. अखेर स्थानिक सामाजिक कार्यकर्त यांनी सदर गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करण्यासाठी व शिवकालीन तलावाचे खोलीकरण करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. व सन २०१८ च्या एप्रिल महिन्यापासून गावातील जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत जलसंधारणाच्या कामांना सुरूवात झाली. यामध्ये भुजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने भुतामारी ते उंद्री सिंचन प्रकल्प या नाल्याचे ३ हजार ७०० मिटर लांबी, ६ मीटर रूंदी व अडीच मिटर खोलीचे काम पूर्ण झाले. तसेच गावात जवळपास प्रत्येकी ४ एक्कर क्षेत्रफळाच्या दोन शिवकालीन तलावाचे काम देखील झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गावाच्या पूर्वेकडील शिवकालीन तलावात ६० बाय ६० मिटर लांबी रूंदी व दीड मिटर खोलीचे खोलीकरणाचे काम पूर्ण झाले तर पश्चिमेकडील शिवकालीन तलावाच्या खोलीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर १२० बाय ६० मिटर लांबी रूंदी व दिड मिटर खोलीचे खोलीकरण होईल. सदर गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठ्यात वाढ होवून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. परिणामी गावातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करता येईल.
कृषी विभागामार्फत ढाळीचे बांध
कारंजा तालुका कृषी विभागाच्यावतीने सदर गावात असलेल्या शेतजमिनीचे ९ गटात वर्गीकरण करून त्यामध्ये ३९ हजार ९४० मिटर लांबीचे ढाळीचे बांध टाकण्यात आले. तर २ हजार ९९८ मिटर लांबीच्या सी सी टी चे काम सुध्दा करण्यात आले. सदर गावातील जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत होणारया कामासाठी ३३ लाख रुपए शासनाने मंजूर केले होते. त्यापैकी ४३ टक्के रक्कम अर्थात १४ लाख १७ हजार रुपए खर्चून ४७ हजार ७१० मिटर लांबीचे जलसंधारणाचे काम करण्यात आले आहे.