लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीप्रमाणे यंदाही रेतीघाटांच्या लिलावांवर बंदी कायमच आहे. पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे उद्भवलेल्या या बिकट परिस्थितीमुळे रेतीचे दर गगणाला भिडले असून घर बांधकाम करणारे नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.वाशिम जिल्ह्यात प्रामुख्याने वाशिम आणि रिसोड तालुक्यात सर्वाधिक रेतीघाट आहेत. मात्र, चालू वर्ष वगळता मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प राहिले. याशिवाय जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले. यामुळे परजिल्ह्यातून रेती वाहून येण्याची आणि ती अडविण्याच्या प्रक्रियेस बहुतांशी ‘ब्रेक’ लागला आहे. अन्य ठिकाणच्या छोट्या नद्या, तलाव आदीठिकाणी भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि पर्यावरण विभागाची परवानगी नसल्यामुळे गतवर्षी एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. तीच स्थिती यंदाही कायम असल्याने जिल्ह्यात कुठेच रेती मिळेनाशी झाली नाही. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात रेती मिळत नसल्यामुळे रेती विक्रेत्यांनी आपला मोर्चा परजिल्ह्यात वळविला असून तेथून येणाºया रेतीचा दर मात्र ५००० रुपये प्रती ‘ब्रास’पेक्षा अधिक असल्याने घरांचे बांधकाम करणारे नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. असे असताना यावर्षीही वाशिम जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव होण्याची सुतराम शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेतीघाटाच्या लिलावांवर बंदी कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:21 PM