वाशिम : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी जि. वाशिम या तिर्थक्षेत्राच्या अतिरिक्त विकास आराखड्यांतील मंजूर कामे मार्गी लावण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने दहा कोटी रुपयांच्या निधीस २७ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली आहे. यापैकी ६ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी यांचेकडे वितरीत करण्यात आला आहे.श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी ता. मानोरा जि.वाशिम या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी यापूर्वी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामेही झाली. या तिर्थक्षेत्राच्या प्रकल्पाकरीता सन २०१९-२० या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यास्तव १० कोटी रुपये रकमेच्या नवीन बाब प्रस्तावास मान्यता मिळालेली आहे. सदर तरतूदीतून श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी जि. वाशिम या तिर्थक्षेत्राच्या अतिरिक्त विकास आराखड्यांतील मंजूर कामे पूर्ण करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात येत आहे, असे ग्रामविकास विभागाने २७ नोव्हेंबरच्या निर्णयाद्वारे स्पष्ट केले. सदर निधी हा प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवरच खर्च करावा लागणार आहे. निधी मिळणार असल्याने तिर्थक्षेत्राचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होईल, अशा आशावाद भाविकांमधून व्यक्त होत आहे.सदर कामांच्या अंदाजपत्रकास सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक मंजूरी असल्याची व बांधकामासाठी लागणारी आवश्यक जागा ग्राम पंचायत, जिल्हा परिषद मालकीची आहे, याची खात्री जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीला करावी लगणार आहे. तसेच मंजूर निधीचा योग्यरितीने विनियोग होण्याच्या व कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही या दृष्टिने जिल्हाधिकाºयांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही ग्राम विकास विभागाने दिल्या आहेत.
बंजारा काशी पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासाठी अतिरिक्त निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 4:32 PM